Pages

परिघाबाहेरची अभिव्यक्ती

गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने एक अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे कलम 377 आता रद्द झाले आहे आणि आपल्या देशातल्या लैंगिक अल्पसंख्यांक मंडळींना दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून लैंगिकतेच्या अभिव्यक्तीच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला कोर्टाच्या पायरीवर यश आलं आणि अर्थातच ह्या बातमीमुळे देशभरातल्या एलजीबीटी समुदायाने आनंदाचा जल्लोष केला. सहा सप्टेंबरला सकाळीच कोर्टाचा निकाल आला आणि त्यानंतर ही महत्त्वाची बातमी दिवसभर सगळ्या वृत्तवाहिन्यांवर वेगवेगळ्या रूपात झळकत होती ! त्या निमित्ताने एलजीबीटी समुदायातले लोक घरोघरच्या टीव्हीच्या पडद्यांवर आपल्या भावना व्यक्त करताना दिसले! एरव्ही स्त्रिया किंवा पुरुष या दोन ठळक प्रकरांच्यापेक्षा निराळी लैंगिकता असलेल्या व्यक्ती आपल्याला टीव्हीवर सहसा दिसत नाहीत. कारण निराळी लैंगिक अभिव्यक्ती असलेल्या लोकांना प्रसारमाध्यमात अगदी क्वचितच जागा मिळते ! पण ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्या दिवशी मात्र सगळ्याच वृत्तवाहिन्यांनी ह्या निकालाविषयी अनेक समलैंगिक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या; त्यासोबत कट्टर धार्मिकता जपणार्‍यांच्या बरोबर वादविवाद देखील घडवून आणले. पण कदाचित सुप्रीम कोर्टाच्या ह्या ताज्या निर्णयाच नावीन्य संपलं की पुन्हा समलैंगिकतेविषयी काहीतरी वाद उद्भवेपर्यन्त ही मंडळी अदृष्यच राहतील!
खरंतर सहा सप्टेंबरला भारतीय दंड विधानचे 377 कलम रद्द करतानाच आपल्या निकालपत्रात सुप्रीम कोर्टाने विविध प्रसारमाध्यमातून ह्या निर्णयाचा प्रचार करण्याची जबाबदारी सरकारवरती सोपवलेली आहे. पण केंद्र सरकारने मुळात ह्या सुप्रीम कोर्टाने हे कलम रद्द करण्याचा जो निर्णय घेतला त्यावरसुद्धा  आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही, त्यामुळे हे सरकार सुप्रीम कोर्टाच्या ह्या आदेशाची कशा प्रकारची आणि किती प्रमाणात अंमलबजावणी करेल त्याबद्दल शंकाच वाटते! पण सरकारी आदेशाची वाट न बघता प्रसारमाध्यमे स्वेच्छेने पुढाकार घेऊन समलैंगिक व्यक्तिना सामावून घेतील का? सध्यातरी आपल्या देशात सिनेमा, नाटके, टीव्हीवरचे टॉकशोज आणि बातम्या किंवा अगदी कथाकादंबर्‍या सारख्या माध्यमातून देखील समलैंगिक व्यक्तींचे किंवा त्यांच्याशी संबंधित सामाजिक व्यवहारांचे चित्रण क्वचितच केले जाते! आठवून पहा - तुम्ही एलजिबीटी समुदायातल्या व्यक्तिबद्दलची बातमी कधी पाहिली होती? न्यूज चॅनेल्सवर रोजच्यारोज राजकारण, अर्थकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या घडामोडींवर विविध चर्चा घडतात – त्यामध्ये कधी ट्रान्सजेंडर, गे किंवा लेस्बियन मंडळींच्या विशेष दृष्टीकोनाची मांडणी करण्यासाठी त्यांना बोलावले जाते का? आपल्याला एलजीबीटी कम्युनिटी मधल्या किती व्यक्ति माहीत आहेत – असं जर विचारलं तर एक लक्ष्मीनारायण त्रिपाठी आणि दुसरी गौरी सावंत ह्यांच्या व्यतिरिक्त किती नावं आपल्याला  आठवतील? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीसुद्धा नावं आपल्या डोळ्यासमोर येणार नाहीत! समलैंगिकतेच्या चळवळीतले एक कार्यकर्ता गौतम भान असं म्हणतात की समलैंगिक माणसेसुद्धा आपल्यातलीआहेत असं समाज मानतनाही, उलट ते दूर कुठेतरी आपल्या दृष्टीआड, अज्ञात ठिकाणी असतात असं वाटून घेणं समाजाला सोयीचं वाटतं! जी माणसे पुरुष किंवा बाई यापैकी कुठल्याही एकाच साच्यामध्ये बसत नाहीत त्यांना कदाचित आपण ‘माणूस’ देखील मानत नाही! लैंगिकतेची निराळी अभिव्यक्ती करणार्‍या समाजातल्या घटकांवर आपण काही अन्याय केलेला आहे, याची जाणीव तरी मुळात प्रसार माध्यमांना असते का?  
आपल्या देशात साधारण तीसलाख ट्रान्सजेंडर व्यक्ति आहेत, असा एक अंदाज आहे. त्यातल्या बहुसंख्य व्यक्तिना कमालीच्या गरिबीत किंवा भीक मागून देखील जीवन कंठावे लागते, विविध प्रकारच्या अत्याचारांना बळी पडावे लागते - पण त्याविषयी वर्षभरात किती बातम्या पाहायला मिळतात? अशा प्रतिकूल सामाजिक परिस्थितीशी झगडून शिक्षण घेणार्‍या, नोकरी करणार्‍या ज्या मोजक्या ट्रान्सजेंडर व्यक्ति असतील त्यांच्या यशोगाथा तरी पाहायला मिळतात का? उलट बरेचदा तथाकथित विनोदी कार्यक्रमातून अशा व्यक्तींच्या हावभावांचे, दिसण्याचे विडंबन आणि नकारात्मक चित्रण केले जाते. एकीकडे रोजच्या आयुष्यात भेटणाऱ्या अशा माणसांकडे माणूस म्हणून पाहाण्याची आपण टाळाटाळ करतो; पण त्याचवेळी सिनेमा नाटकातून मात्र पुरुषांसारखे आवाज, देहयष्टी आणि बायकांसारखे पेहराव असे मिश्रण असलेल्या व्यक्तिरेखा पाहून आपण आपली करमणूक करून घेतो. कुठल्यातरी काल्पनिक मजबूरीमुळे स्त्रीवेषात वावरणारे पुरुष आणि त्यांच्या वागणुकीतून घडणाऱ्या गमतीजमती हा तर हशा वसूल करण्यासाठीचा वर्षानुवर्षा पासूनचा हमखास यशस्वी फॉर्म्युला ठरून गेलेला आहे. ‘कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ सारख्या टीव्ही शोजमध्ये तथाकथित विनोद निर्मितीसाठी पुरुषांनीच स्त्रियांच्या व्यक्तिरेखा साकारण्याचा नवा फॉर्म्युला लोकप्रिय होत चाललेला आहे. पण एखाद्या ट्रान्सजेंडर कलाकाराला नाटक, सिनेमा किंवा टीव्ही सिरियल मध्ये काम देण्याची हिम्मत किती निर्माते करू शकतील? किंवा एखादी वृत्तवाहीनी बातम्या वाचण्याचे काम एखाद्या ट्रान्सजेंडर व्यक्तिला देईल का? ही काही अशक्य कोटीतली घटना नाही. आपल्या देशात अगदी तुरळक प्रमाणात का होईना, पण असे प्रयोग झालेले आहेत.
दोनच वर्षांपूर्वी एका तामिळनाडू मधल्या लोटस टीव्ही ह्या न्यूजचॅनेलवर पद्मिनी प्रकाश ही व्यक्ति देशातली पहिली ट्रान्सजेंडर न्यूज anchor म्हणून काम करायला लागली आहे. त्याआधी रोज वेंकटेशन ह्यादेखील एक टॉक शो सादर करत होत्या. अगदी एका मराठी टीव्ही चॅनेलवरसुद्धा श्री गौरी सावंत काहीकाळ एका कौटुंबिक कार्यक्रमाचे anchoring करत होत्या. अशा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या प्रयत्नांची संख्या अजून बरीच वाढायची गरज आहे! तेव्हाच समाजात पारंपरिक चौकटी बाहेरची लैंगिक ओळख सांगणार्‍या व्यक्तींचा स्वीकार आणि माध्यमातले त्यांचे सकारात्मक चित्रण परस्परपूरक होईल. सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक महत्त्वाचा निर्णय देऊन लैंगिक अल्पसंख्यक व्यक्तींच्या अभिव्यक्तीला प्रतिष्ठा दिलेली आहे. यापुढची मोठी जबाबदारी आपल्याला सर्वांना निभवायची आहे! 


No comments:

Post a Comment